Monday, August 21, 2017

"ते बालपण आणि तो बोजारा"

माझी आठवण म्हणून दरवेळीसारखा आजही घरून कॉल आला, मात्र वेगळ्या अनुषंगाने. रोजच्या सारख्या नव्हतं ते पण जिव्हाळा तोच होता आणि गोष्टी त्याच बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या.

''दादा! आमच्या सर्वांकडून पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! बोजारा घ्यायला ये. बैल नाही दिसले का आज? हा! हा! तिकडे तर बैल पण दिसत नसतील." आई (मम्मी), बाईसाहेब(बहीण), बाबा(पप्पा), आमचा मल्टिस्किल(लहान भाऊ) आणि घरचे-आजूबाजूचे चांड्री लोक एक सुरात शुभेच्छा देत बसलेले. मी तर एकदम आनंदी झालो. सुखावलो एकदाचा हे ऐकून आणि हरखून गेलो. "तू नसतोस ना कधीच! करंज्या केल्यात आज. आम्हीच खायच्या काय फक्त?" बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि पुढे आईशी त्याबद्दलचं बोलणं सुरू झालं.
आठवणूनही एकदाचा दिवसभरात विसरून गेलो होतो की आज पोळा आहे म्हणून. तसं घराबाहेर असलं किंवा माणूस दिवसभर गुंतला की शहरांमध्ये हे कळतही नाही. नेहमीप्रमाणे कॉल करून बोलेन या भूमिकेतच असताना त्यांच्याकडून फोन आला आणि मी सुखावलो. पोळ्याचा दोन दिवसांचा सण, त्यातली मजा, तेव्हाचे बालपण आणि आजचं आपलं जगणं हे सर्व पुन्हा डोळ्यासमोर आलं. त्यातल्याच काही आठवणी इथे मांडायचा हा प्रयत्न....

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि त्यात बैल ह्या प्राण्याला विशेष महत्व, कारण त्यास तसे कारण आहेत. गावातल्या शेतकऱ्यांचा हा साथीदार अवघ्या आयुष्यभर साथ देऊन शेतावर आपलं आयुष्य वेचत असतो. धणीपेक्षाही जास्त मेहनत याची असते. मग ह्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे 'बैलपोळा'. जिल्हा परिषदेच्या शाळेत जेव्हा शिकायला सुरवात केली तेव्हापासूनच हे माझ्या लक्षात आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच 'मारबत' आणि सायंकाळी लहान मुलांच्या लाकडी नंदीबैलांचा 'तान्हापोळा'. असा हा आमच्याकडे पूर्णपणे दोन दिवसांचा साजरा केला जाणारा 'पोळा' सण.

माणूस जसजसा मोठा होत जातो, त्याचा प्रवास विस्तारत जातो. आज  इथे आहे तर उद्या तो कुठे असेल हे कुणालाही सांगता येत नाही. आमचं तर असंच झालेलं, सुरुवातीची गावच्या झेडपीतील पाच वर्षे सोडलीत तर बाकी संपूर्ण आयुष्य बाहेरच. मात्र मला गावातलं गावपण अजूनही अनुभवायला मिळते हे मात्र छान. त्यामुळे गाव, त्यातली परिस्थिती, लोकांचं राहणीमान हे जरी बदलत असलं तरी गावातली माती, तिथले सण आणि त्याच जगणं अजूनही तसंच असतं. मग अशात त्या मातीचा गंध आपल्याला लागलेला असतो जो सुटता सुटत नाही. कितीही दूर गेलं तरी सणानिमित्ताने का होईना आठवणी जाग्या होतात.
आज गावातला पोळा न बघून मला तब्बल बारा वर्षे झालीत. तशी माझ्यासारखी आमच्यातली बरीच मंडळी एवढा काळ लोटून घराबाहेर आहेत मात्र माझ्यासाठी हे खूप मोठं असं वाटतं. कारण गावातल्या पोरांनातरी अशा अनेक गोष्टी आणि सण यांचं एका वेगळ्याप्रकारचं महत्व असतं. खरं सांगायचं तर पोळा हा आमचा सर्वात जास्त आवडता असायचा. त्याला तसं कारण आहे. त्यात आम्हाला काहीतरी मिळायचं जे त्याकाळी खूप भारी वाटायचं, श्रीमंत झाल्यासारखं एकदम. या दिवशी 'बोजारा' म्हणून आम्हाला वडीलधाऱ्यांकडून पैसे मिळायचे. ज्याचा आनंद कितीतरी दिवस आमच्याकडे टिकायचा.

पोळ्याच्या दिवसाची सुरुवात मातीचे बैल बनवण्यासाठी लागणाऱ्या माती आणण्यापासून व्हायची. गावातली अख्खी चिल्लरपासून जवानपर्यंतची मंडळी गावाच्याबाहेर कुणाच्यातरी वावरत जाऊन चिकन माती आणायला कूच करायची. मग तिकडून घरी परत येण्यासाठी आम्ही बकरे मात्र मस्त दोनेक तास लावायचो. वावरात खोदून केलेल्या खड्यांमुळे वावरवाल्याच्या शिव्याही खायचो. तरीपण ते काम झाल्यानंतर एक भारी समाधान  चेहऱ्यावर असायचं व नंतर दुसरं काम म्हणजे त्या मातीने पूजेसाठी बैलजोडी बनवाणे. त्यांना चांगलं सजवत होतो. बेलपत्री लावून पूजेसाठी तयार करत होतो. त्यांच्या पाणीपिण्याची डोंगी असं सगळं तयार करायचो. यात सर्वात मोठे प्रेरणास्थान म्हणजे आमचे पप्पा. त्यांना आताही हे एकदम झक्कासपैकी बनवता येते. त्यांच्याकडून मीही शिकून गेलो होतो. तसं हे सध्या अजूनही सुरू आहे. गावात पोळ्याच्यावेळी गेल्यावर हे प्रत्येकाच्या घरी आपणास आढळते.
सायंकाळी मग आखरावर(चौकात) बैलांचा पोळा भरायचा. गावभरचे लोक आपल्या आपल्या बैलजोड्या घेऊन यायचे, एक जत्रेचं वातावरण भरायचं आणि मग पोळा सुटायचा. हे चित्र अजूनही गावांमध्ये आहे. मग पोळा सुटताच आम्ही सर्व चिल्लर पार्टी अख्या मोहल्यातून  वडीलधाऱ्यांचे पाय लागायचो व त्यांच्याकडून 'बोजारा' म्हणून आम्हाला  पैसे मिळायचे. यात सर्वात जास्त आनंद असायचा. यामुळेच आम्हाला खरंतर पोळा खूप आवडायचा. आमच्या आजी-आजोबा, अगदी जवळची माणसे यांच्याकडे तर आमचा बक्कळ बोजारा राखीवच असायचा. त्यावेळी मिळणारे आठ आणे, एक रुपया, पाच रुपये ही म्हणजे जणू आमची भारी कमाईच असायची. घरी येऊन पोळ्याचा फराळ खाण्याआधी आम्ही पैसे मोजून कुठेतरी लपवून ठेवायचो. या क्षणातला आनंद हा इतका असायचा की तो शब्दांतही व्यक्त करता येत नाही. आणि हेच बोजाऱ्याचे पैसे आम्ही दसरा-दिवाळी पर्यंतही साठवून ठेवायचो. ही मजा खरी असायची. 
दुसरा दिवस तान्हापोळ्याचा. या दिवसाची सुरुवात आमच्याकडे 'मारबत' या सकाळच्या प्रहरीच्या पद्धतीने होते. गावातील रोगराई, पीडा, कीटक-किडे, वाईट पद्धती हे सर्व दूर करण्यासाठी सकाळच्या प्रहरीच गावाच्या बाहेर मारबतील नेऊन सोडायची ही प्रथा आहे. यात 'मारबत' या देवीस्वरूपाने एक मातीची मूर्ती बनवली जाते ज्यावर दिवा किंवा मशाल पेटवून एकदम सकाळीच ती गावाच्या बाहेर नेऊन तलाव, बोडी किंवा नाल्याजवळ नेऊन ठेवली जाते. यात अतिशय विशेष आणि आनंदाची अशी गोष्ट म्हणजे सकाळीच हे सर्व करत असताना आमच्या मोर्च्यांत जे नारे असायचे ते आजीवन न विसरण्यासारखे आहेत. ''कोणालाही घेऊन जा गे मारबत,.......'' आणि असे अनेक नारे अजूनही ओठावर रेंगाळताना दिसतात. त्यादिवशी सकाळीच रस्त्याच्या कडेला बसलेल्यांची मात्र मोठी गैरसोय व्हायची. स्वच्छता अभियानाचा अजून तो मोर्चाच आमचा आणि 'मारबत' हे प्रेरणास्थान. जिल्हा व तालुका ठिकाणावर तर अजूनही मोठ्या आकाराने मारबतच्या मिरवणूक काढल्या जातात. गोंदियातून 'मोठ्या मारबत'चे दर्शन नवख्यांना प्रत्यक्ष होऊ शकते. अशी ही आमची मिरवणूक असते. यात काही वेगळीच मजा आहे जी फक्त गावात राहूनच अनुभवता येते.

पोळ्याचा शेवटचा क्षण म्हणजे 'तान्हापोळा'. यात सायंकाळी आम्ही लहान लहान मुले वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी नंदीबैल घेऊन गावातल्या चौकात जमा व्हायचो आणि लोक हे सर्व बघायला यायचे. त्या नंदी बैलांचे पाया पडायचे व दक्षिणा म्हणून काही पैसे आम्हाला मिळायचे. त्यातल्या त्यात काही स्पर्धाही व्हायच्या व जिंकणाऱ्या मुलांना गावतली मंडळी काही बक्षिसेही द्यायची. माझ्याकडेही त्यावेळी लाकडी नंदी बैल होता व सोबत आमच्या एका काकेभाऊकडे गावातला मोठ्ठा लाकडी नंदीबैल होता. मग तर आमची गॅंग म्हणजे एक वेगळ्याच ऐटीत असायची. आम्ही चार पाच लोक सोडून बाकी कुणाला त्यास हातही लावू द्यायचो नाही. असं हे भारी बालपण व तेव्हाच तान्हापोळा असायचा. हे जरी आजही सुरू असलं तरी तसली मजा आजच्या काळात नाही. कारण त्याकाळी सण म्हणून आम्ही जेवढे उत्साहित आणि उत्सुक असायचो तो आनंद आजच्या लहान मुलांत दिसत नाही. बालपणी आम्ही सणही वेगळ्याच प्रकारे 'जगायचो'. त्यातला आनंद ओळखायचो.

आता हे सर्व क्षण पुन्हा त्याप्रकारे जगण्यासारखे नाही आहेत मात्र बालपणी गाठी पडलेले हे अनुभव आज त्या काळात परतून जाण्याला आकृष्ट करतात. आज समाज बदलतो आहे, सण साजरे करण्याच्या परंपरा बदलत आहेत, त्यातला रस कमी झालेला आहे मात्र ग्रामीण जीवनातील ह्या घडामोडी अजूनही थोडंफार का होईना जिवंतपणा टिकवून आहेत. आपण मोठे होत जातो तसतसा गावाकडे जाण्याचा मोह आपल्याला होत असतो मात्र हे शक्य नसते कारण परिस्थिमुळे बदललेली असते. बालपण हे असं की जे एकदाच जगता येतं मग ते त्यावेळीच भारी जगता येईल का याचा विचार केला तर आठवणीही तेवढ्याच सुंदर आपल्याला लाभतात.

जरी तो 'पोळ्याचा बोजारा' म्हणून आज आपल्या हाती काही नसलं तरी आई-बाबांकडून सर्वात मोठा बोजारा हा आपल्यालाच दिला जातोय ही जाणीव आहे. यापेक्षा अजून काय हवं माणसाला. ही जाणीव मनात असली की जगण्याची व जिंकण्याची जिद्द वाढत जाते व आपण आपल्या जगण्यात अजूनच गुंतत जातो.
आणि शेवटी आठवण म्हणून आपल्याकडे उरतं काय?
तर या प्रसंगानुसंगाने......
              "ते बालपण, तो बोजारा!"

Monday, August 7, 2017

'अनामिक' नातं!

खूपदा असंही होतं ना की आयुष्यात अशी काही नाती असतात ज्यांना विशिष्ट असं नावच देता येत नाही. खरंतर ती वेगळीच असतात, बंधनाने आणि गुणधर्मानेही. प्रत्येकाच्याच आयुष्यात असं घडेलच असं नाही मात्र ज्यांच्याकडे अशी नाती( नातं) असतात त्यांच्याकडे असं विशिष्ट 'नाव' त्याला नसतंच पण अनुभव मात्र तितकाच विस्तारलेला असतो आणि चांगला असतो.

मग ते नातं ना घट्ट मैत्रीचं आहे असं वाटतं (कारण तसं कुणी व्यक्त केलेलं नसतं, पण प्रत्येकच मैत्रीचं नातं व्यक्तच करायला हवं या विचारांचा मी नाही.), ना शत्रुत्वाचं असतं, ना बहीण-भाऊच असतं, ना गुरू-शिष्याचं असतं, त्याहीपुढे ते प्रीतीचंही नसतं. खरंतर ह्या सर्व वरील नातेसंबंधात कुणीही तसं नेमकेपणाने व्यक्त झालेलं नसतं म्हणून आपल्याला वर्गीकृतही करता येत नाही व नावही देता येत नाही.

पण ते एक असं 'नातं' असतं, ज्यातून एकमेकांना एकमेकांचा किंचित त्रासही होत नाही आणि भरपूर व्यक्तही होता येतं. एक निखळ आनंदही त्यात असतं. प्रत्येकाने शोधलं तर त्याच्या आयुष्यात तसं नातं कदाचित सापडेलही, संबंधित व्यक्तीही सापडेल मात्र त्यास 'नाव' काय द्यावं  हा मुद्दा प्रश्नच पाडणारा असेल.
मग असंच चालावं आयुष्याच्या प्रवासात सोबतीने फक्त त्या नात्यातील अनुभव आणि आनंद गाठीशी घेऊन. मात्र टिकवून ठेवावं प्रत्येकानं ते नातं चिरकाल.... 'अनामिक' म्हणूनच..!!