Tuesday, October 11, 2016

एक प्रवास-आठवतो मज गाव!

'जर गावात जन्मलात व तुमचं बालपण गावच्या मातीत गेलंय तर वाचा,तुम्हाला ते दिवस परत नक्कीच आठवतील. ज्यांना असा सुवर्ण क्षण आयुष्यात लाभला नाही त्यांनी नक्कीच वाचा, खऱ्या ग्रामीण जीवनाचा प्रवास व बालपणाच्या आठवणी काय असतात ते आढळून येईल आणि जे अजूनही गावात आहेत त्यांच्यासाठी तर जणू हि मी दिलेली स्तुत्य अशी भेट समजावी जी आपण गावात राहतो याचा 'अभिमान' प्रत्येकाच्या मनात निर्माण करेल.'

आयुष्य एक प्रवास आहे. एक असा प्रवास ज्यात सतत गाडीघोड्याची, सायकल स्वारीची, चारचाकी वाहनांची किंवा दळणवळणाच्या साधनांची गरज नसते. तर आयुष्य जगत असताना सभोवतालच्या गोष्टी जे अनुभव देऊन जातात, जे बदल घडवून जातात, जगण्याच्या व्याख्येला सुंदर करत जातात अशा जडणघडणाला 'प्रवास' म्हणतात. माझ्यामते एका प्राणीमात्राच्या आयुष्याचीही मी हीच व्याख्या करेन. असंच काही जे मला अनुभवता आलं, माझ्या हृदयात आठवणी कोरून गेलं अशा क्षणाचा हा आढावा ब्लॉगरूपाने.


रोजच्या प्रमाणे आजही ५.२०ला कंपनीला सुट्टी झाली. आम्ही दरदिवशीच्या प्रमाणे ५.३५ ते ५.४०च्या सुमारास दुसऱ्या नंबरच्या कंपनीच्या गाडीने आपाल्या आपल्या रूमवर जायला निघालो. आज तसं गाडीमध्ये आम्ही फक्त पाचच लोक आणि एक सहावा गाडीचालक. सहसा अशा आयुष्यात, रोजच्या कामात प्रवास तसा सारखाच असतो,सारखाच रस्ता, सारखीच वेळ, सारखेच देखावे आणि जवळपास सारखंच सर्वकाही. मात्र आज थोडा प्रवास बदलला, वेळही बदलला आणि रस्तेही.

वाटेत येणाऱ्या जवळच्या गावी आज स्थानिक मुख्यमंत्री यांची ३किलोमीटर पदयात्रा होऊ घातलेली. सुरक्षा, गर्दी यामुळे जरा वर्दळ वाढलेली, आणि जवळपास पूर्णच रस्ते बंद पडलेले. सहसा अशावेळी चारचाकी वाहने गर्दीतून काढणे म्हणजे स्वतःच्या डोक्याला मनस्ताप करवून घेणे. शेवटी वाहन चालकाने समोर खुप गर्दी आहे, रस्ते बंद पडलेलेत म्हणून दुसऱ्या लांब,लहान अशा पर्यायी रस्त्याचा मार्ग हाताळला. तरीही तिकडेही अशीच काही गर्दी, मात्र असो थोडा त्रास घ्यावा लागला, शेवटी आपल्या आपल्या ठिकाणांवर पोहचायचंच होतं.आणि हि आज बदलेली वाट, त्यात बदललेला वेळ आणि प्रवासात आलेले अनुभव मला माझ्या गोष्टींकडे घेऊन गेले, माझ्या बालपणात घेऊन गेले.

हळूहळू गाडी समोर धावू लागली, आता मूख्य रस्ते दूर झालेले, शेतातून, गावातून जाणारा रस्ता लागू लागला त्यातून गाडी धावू लागली. वाटेत येणारे अनुभव मी अनुभवू लागलो. फिरायला जातोय किंवा कुठेतरी मज्जा करायला जातोय अशातला काही भाग नव्हता मात्र मी ज्या मातीवर खेळलोय, जो ग्रामीण आयुष्य मी जगलोय त्या आयुष्याला पुन्हा आठवण करून देणारे क्षण मला स्पर्शून गेले. गाडी आता रानातून चालू लागली, दोन्ही बाजूंना विस्तीर्ण शेतजमीन, ऊसाचे उंच उंच पीक, त्यातून अधामधातच डोकावणारी गडद झुडुपे, उंच उंच निलगिरीचे झाड आणि खूप काही. हे सर्व बघताना असं वाटायचं की जणू मी माझ्या गावाकडील रस्त्यांवरूनच प्रवास करतोय फक्त पीक आणि झाडे तेवढी बदललेली मात्र दृश्य तेच हिरव्या झाडीचं, तेच आल्हाद निर्माण करणारे देखावे, मधातच खाचखडगे पडलेले रोड, तर कधी कच्चा रस्ता. हळूहळू अंतर कापल्या जात होतं आणि माझं मन कुठेतरी हरवून जातं होतं, मला माझ्या असलेल्या गोष्टींची आठवण करून देत होतं.

मी इथे असं बोलतोय, तर ते नेमकं का म्हणून? कदाचित कुणी समजेल आणि नाहीच तर पूढे समजून येईलच. बाकी इतर चार लोक गाडीमध्ये गप्पा मारत बसलेले, चालक आपल्या अनुभवानुसार गाडी समोर चालवत बसलेला, कधी हसऱ्या, कधी दुखऱ्या रेषा चेहऱ्यावर दर्शवत. मात्र मला याचं काही भान नव्हतं, मी माझ्यात हरवलो होतो, आठवणींत रमलो होतो. मला सर्व आता माझे वाटत होते, जुने दिवस आठवत होते. रस्ते थोडे कच्चे होते, पाऊस-पाणी यांमुळे व मोठ्या ट्रॅक्टर मुळे मातीच्या रस्त्यांवर उंचसखोल अशा आकृत्या पडलेल्या. बाकी चौघे गप्पा ठाकत, अशा रस्त्यांना हिनावत बसलेले, नाराज चेहरे घेऊन फसलेल्या भूमिकेत हावभाव दर्शवत बसलेले. तसं उत्तराखण्ड आणि उत्तरप्रदेश या राज्यांची स्थिती आपल्याला माहीतच आहे.मग त्यातल्या रोडच्या परिस्थितीचं स्वतंत्र असं काही वर्णन करणे गरजेचे नाहीच. मात्र असो माझं काही लक्ष याकडे नव्हतं. मी आपल्याच दुनियेत रमलो होतो. गाडी आता पूढे जाऊ लागली, आणि वाटेत तीन-चार गाव पडले. गाव म्हणजे पूर्णतः गावच. सारखेच ग्रामीण दृश्य, घराबाहेर सायंकाळी बसलेली माणसे, गावातल्या गल्लींमध्ये खेळणारी, बागडणारी ती लहानसहान मुले, त्यांचे ते इकडे तिकडे स्वैर फिरणे, मधातच आडोशाला बांधलेली, गोठ्यात बांधलेली गुरंढोरं हे सर्व मी बघितलं. मुळात खूप दिवसांनी मी कुठेतरी गावातुन प्रवास करत ते दृश्य अनुभवत होतो. खुप दिवसांतून त्या सर्व गोष्टी पून्हा बघत होतो , स्वतंत्रपणे काहीही टेन्शन न घेता हसता हसता खेळणारी व भांडणारी मुले मी बघत होतो आणि मला माझा तो भूतकाळ आठवत होता. माझे गाव आठवत होते, प्रत्यक्ष चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे होते. असं वाटत होतं , कीआपण इतके मोठे झालोत का कि आता बालपण आणि ते ग्रामीण जीवन अनुभवू शकत नाही?  का ते जगणे आपल्याला परत मिळणार नाही का? का फक्त सुट्यांपुरतंच गावी जावं, नवख्याप्रमाणे राहावं आणि का पुन्हा कुठेतरी घराबाहेरचा प्रवास करावा?हे प्रश्न मनी येऊ लागले आणि मला मार्मिकतेचा तो भविष्यकाळ आठवू लागला, ते प्रश्न भेडसावू लागले की मी तर सध्या काहीएक दिवसांसाठी दूर आहे, मात्र मला कायमच असंच गाव सोडून राहावं लागलं तर, ह्या गल्ली आणि चौकातल्या मस्तीला मुकावे लागले तर?

आता प्रवास सुरूच होता. खूप ईच्छा होती की परराज्यातील लोक व त्यांचे ग्रामीण देखावे कसे असतील, त्यांची घरे कशी असतील हे पाहावे याची उत्सुकता होती ती सुदैवाने पूर्ण झाली. गावातल्या अरुंद रस्त्यांना पार करताना गाडी हळूच चालायची म्हणून निरीक्षणाचा त्रास झाला नाही, जे अनुभवता येईल ते अनुभवलं व आपल्या आठवणी ताज्या करत गेलो. इथली घरे हि उंच उंच, लोक इतर धर्माची असली तरी त्यांचे घर असेच उंच उंच जरीही ते मातीचे किंवा जुनाट प्रकारचे असले तरीही. इथे बहुतांश घरे हि जुनीच वाटली,कौलारू तितकी दिसली नाहीत मात्र जी होती ती उंच आणि भव्य वाटायची. सहसा खुपसारे कुटुंब इथे एकत्र राहत असावेत. लहानपणापासूनच डोक्यांवर वर्तुळाकार टोपी घालत पानटपरी किंवा दुकानावर बसलेली मुले नजरेस पडायची. बाकी रस्त्यांवर,खेळणारी , हुंदडणारी पोरं मंडळी. हे सर्व चित्र मी बघत होतो व बालपण आठवत होतो. इथे लोक वेगळी आहेत, वेगळ्या धर्माचीही आहेत, मात्र जगण्याचं चित्रण एकच, गाव व त्यात जपल्या जाणारं ग्रामीणत्व हे सारखंच.
मला कळकळीने माझ्या गावची आता आठवण येत होती. ते बालपण आठवत होत ज्यात आम्ही मुक्तछंदाने बागडायचो, खेळायचो, आरडाओरडा करायचो.असं वाटायचं की कधी जातोय आणि कधी नाही, मात्र दुसरा प्रश्न उद्भवतो जाऊन काय करेन, काय ते बालपण मला परत मिळेल? काय तीच मजा आता मला घेता येईल? ते निरागस जगणे आणि तो मातीचा स्पर्श बिनदिक्कत मला घेता येईल? भविष्यात त्याच मातीवर रोजचा दिवस काढता येईल का?असे असंख्य प्रश्न मनात रेंगाळू लागले आणि मी त्यांत रमलो, गुंतलो व शेवटी दरदिवशी जवळपास ३० मिनिटे असणारा प्रवास आज १.३० तासांचा असूनही कसा संपला तो कळला नाही.

वर दिलेले आजचे वर्णन हि तर एक पार्श्वभूमी होती मात्र  जेव्हा रूमवर पोहचलो तेव्हा खरं तत्वज्ञान कळून आलं, आयुष्याचा प्रवास कुठे नेवून ठेवतो या विचारात मन गुंतलं. आयुष्याचा गुंता कसा वाढतोय हे आईला बोलावं अस वाटलं आणि हात ब्लॉगच्या लेखणीवर येऊन सरळ कळफलक दाबत चाललाय.तर शेवटी का? का म्हणून लिहिलंय मी? हा प्रश्न मला विचारा, त्या माणसाला विचारा जो आपल्या मातीशी जुळला आहे, ज्याने बालपणात गल्लीगल्लीत आयुष्याचा आनंद वेचला आहे.

आजकाल नोकरी, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक मिळकत या सर्वांसाठी माणसाला घराबाहेर पडावं लागतं, ईच्छा नसताना घर सोडून इतरत्र जगावं लागतं आणि अशात आपल्या गोष्टींत असलेला जिव्हाळा जपून ठेवणं, त्यांत तेवढीच आवड निर्माण करून ठेवणं हे कसोटीच काम असतं. आपल्या मातीशी असलेला स्नेह जपून ठेवणं सर्वांना जमत नाही. ज्याला जमतं त्याला त्याशिवाय राहवत नाही आणि कशीतरी आठवण येतेच. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपली जन्मभूमी विसरत चाललोत, त्या मातीला दुरावत चाललोत जीने आपल्याला जगण्याचं बळ दिलं, सौंदर्य दिलं. शिक्षणासाठी आधीपासूनच बाहेर राहिल्यावर घरी राहायला कमी वेळ भेटू लागला. बरं झालं की बालपण आम्ही गावात अनुभवलं आणि आताही गावातच जगतोय ज्यामुळे जिव्हाळा कायम राहिला. तरीही सध्या गावात राहायचं म्हणजे सुट्टी हाच एक पर्याय आणि इतर गावांमध्ये, ग्रामीण आयुष्याला जगायचं, भेट द्यायची म्हणजे लग्नसमारंभाशिवाय दुसरा पर्याय सापडता सापडत नाही आणि तशात गावातले जगणे तितके अनुभवता येत नाही.

तंत्रज्ञान आणि विकासशीलतेच्या वर्तमान काळात पैसा हि खूप मोठी गोष्ट बनली आहे आणि प्रलोभन देणारी वस्तू बनली आहे की त्यास मिळवायला व्यवसाय, कार्यक्षेत्र निवडावं लागतं व ते सहसा स्थानिक जागी मिळत नाही. अशावेळी घराबाहेर पडणे हा एक पर्याय सर्वांकडे खुला असतो. आयुष्य काय हे यापासून सुरु होतं. घरी राहून काम करायला काहीएकांनाच साध्य होतं बाकींसाठी पर्याय बाहेरचाच. मग अशावेळी बघायचं कि पैसाच सर्व काही आहे का? पैसा गरज आहे मात्र आपली माती, आपले ग्रामीण जीवन, आपले घर  हे सर्व आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. जेव्हा आपल्याजवळ सर्व असते तेव्हा माणसाला किंमत कळत नाही मात्र जेव्हा त्या गोष्टींपासून दुरावा निर्माण होतो तेव्हा त्यांचे महत्व कळतं. कारण दरवेळी पैसे सर्व नसून आपल्या असणाऱ्या गोष्टीही आयुष्यात पैलू पाडून जातात. आधुनिकतेच्या व चकचकीच्या या युगात मातीत खेळलेल्या,त्या मातीने बालपणात अंग भरवलेल्या लोकांना मोठे झाल्यावर,पैसा आल्यावर ती मातीही नकोशी वाटते. मात्र ज्याची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळली आहे त्यांच्यासोबत असं घडुच शकत नाही. तुम्ही कितीही दूर राहा मात्र त्या मातीला साम्य असणाऱ्या, बालपणाला सूचित करणाऱ्या गोष्टी दिसल्या कि त्याला त्याचं घर आठवत, ती माती आठवते, ते लोक आठवतात व त्या मातीवर घालवलेले दिवस आठवतात. आणि हेच सारं घडलंय आज माझ्याशी.सुदैवाने इतकं छान कि अजूनही मी गावात आहे, त्या मातीच्या सानिध्यात आहे. फरक इतकंच कि सध्या नाही . मग शेवटी प्रश्न मनात हा भेडसावतो, कि पैसे शोधता शोधता मी भविष्यात माझं हे सर्व आपलं असलेलं तर नाही ना हरवून देणार? कसं हे सर्व जपता येणार? कि संपलं ते सर्व, आता बाहेरच जगायचं?

शेवटी उरलेलं हेच, कि "त्या आपल्या गल्लीत आपण बालपणी कुणाच्याही धाकात न राहता मनसोक्त बेभान मोठ्याने ओरडायचो, स्वच्छंद हुंदळायचो, मात्र आजकाल इथे तर हळुवार बोलायलाही माणसे शोधता सापडत नाहीत!!'


दिनांक:- १०/१०/२०१६
२३:४५
©सागर (@sbisensagar)