Friday, January 15, 2016

एक विक्रमी पाऊल- मराठी ट्विटरसंमेलन

"जिथे प्रवासाचा अंतच नाही,
तिथे कुणी कसं संपणार।
सज्ज झालोत पुन्हा आम्ही,
आता मराठीसाठी हरकुणी झुंजणार।।"
सर्वांना माहित आहे आजचे जग हे धकाधकीचे आहे, धावपळीचे आहे, जिथे लोकांना श्वास घ्यायला आणि निःश्वास सोडायला पण फावला वेळ मिळत नाही. मग यात आपण आपल्याला हरवून बसतो तर कधी कधी आपल्याशी निगडित असलेल्या वस्तूंना हरवून बसतो. मुळात त्या आपल्याला हव्याच असतात, त्यविना आपले जगणे काहीशे अर्धवटच असते आणि हे सर्व घडूनही जाते तरी आपल्याला त्या गोष्टींचा हरवण्याचा पत्ताही लागत नाही. मग कधीतरी आपल्याला जाग येते, आपलेपण शोधण्याची वेळ येते आणि आपले स्वतंत्र  अस्तित्व व्हावे असे वाटू लागते त्यावेळी आपण त्या गोष्टीला शोधण्याचा, पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी अथक प्रयत्नांतून ती गोष्ट आपल्याला कालांतराने परत भेटतेही आणि आपल्या जीवात जीव येतो.
मी इथे बोलतो आहे अशाच एका गोष्टी बद्दल, आणि ती गोष्ट आहे 'भाषा'. आजचे वर्तमान युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे आणि सर्व गोष्टी आता झपाट्याने घडत आहेत, क्षणार्धातच परिस्थिती बदलत आहे. याच विज्ञान युगामुळे लोकांमध्ये ज्ञानाचीही भर पडली आहे. मात्र प्रत्येक गोष्ट फायद्याची असते तसे तिचे काही तोटेही असतात. प्रत्यक्षात मी विज्ञानाला तोट्याच्या कटघऱ्यात उभा करणार नाही मात्र कुठेतरी प्राथमिक गोष्टींना (जसे स्थानिक भाषा)यामुळे ठेच लागत आहे. मुळात ती ठेच तंत्रज्ञानाची नसून, वाढत्या इंग्रजी चलनाची आहे. आज प्रत्येकच कामे ही इंग्रजीमधून आकर्षणाचे केंद्र असल्यासारखी होत आहेत. आयुष्य जणू त्यावरच अवलंबून आहे कि काय असं होतंय कधी कधी. मात्र वास्तविक बघायला गेलं तर असं काही नाही. माणूस आपल्या मातृभाषेतही पारंगत होऊन किंवा तिचा अवलंब करून जगू शकतो आणि आपले आयुष्य घडवू शकतो. मात्र त्यासोबतच इतर भाषाही माणसाला याव्यात आणि सध्यास्थितीत त्याची गरजही आहे. एका भाषेच्या सम्पूर्ण ज्ञानासोबत बहुश्रुत होणे हि आज काळाची गरज आहे.
वर्तमान युगात इंग्रजी भाषेचे चलन वाढले आहे त्यामुळे आपल्या स्थानिक भाषेच्या अस्तित्वावर नकळतच प्रश्नचिन्ह उभा होतो. प्रत्यक्ष बघायला गेलं तर आपण सर्वाना माहित आहे कि भाषा हि माणसांना जोडण्याचं काम करते, आणि तिला जर माणूस हरवून बसला तर आपले एक भाषिक अस्तित्वही आपण मग कुठे तरी स्वतःच हरवून बसतो. आपल्या माय मराठी भाषेचंही असंच होत आहे. वाढत्या इंग्रजीच्या उपयोगाने आणि आधुनिकतेच्या वाढत्या जथ्याने आपल्या मराठी भाषेवर मळभ निर्माण झाले आहे. म्हणून आपल्या भाषेला या जडवादविषयक जगात जपून ठेवणे हा गांभीर्याचा विषय आहे.
तंत्रज्ञानाच्या आणि भरभराटीचा या युगात आपली भाषा मग काळाआड झालेली किंवा गडप झालेली आपल्याला आवडेल काय? जर मातृभाषेवर कुणाचे खरंच प्रेम व आपुलकी असेल तर प्रत्येकाकडून या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच येईल. आपल्या मराठीला जपणे हे आता आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य व्हायला हवे आणि बहुतांश लोकांचे ते झालेलेही आहे.
आता मुळात आपल्या भाषेला जपायचे तर ते कसे? यासाठी इंग्रजीचा वापर पूर्णताच सोडून देणे किंवा तिच्या वापराला विरोध करणे असा नाही. मात्र त्यामुळे आपल्या मराठीवर मात्र दगा येऊ नये हीच एक काळजी असावी. तंत्रज्ञान आज ,जगाचे रहस्य आपल्याला सांगते, जगणे घडवते आणि माणसाचे जीवन सुकर करते. यात मग आधुनिकता आहे म्हणून डोळ्यांवर काळीख लेपून तंत्रज्ञान हे धोक्याचे आहे असे म्हणणे किंवा त्याचा वाममार्गाने  सतत विरोध करणे म्हणजे एक मूर्खपणाच.
आता गरज आहे ती भाषा संवर्धनाची आणि ते सर्व आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच करावं लागेल. शीर्षकास अनुसरून बोलताना, लिहिताना आणि ते लिहिण्याच्या अगोदरच आता आपल्याला वाचताना कळले असेल कि सध्या गाजत असलेले ट्विटरसंमेलन हे याचेच एक सर्वोत्तम आणि सूचक असे उदाहरण आहे. माणूस विज्ञानाच्या जोडीने खूप प्रगती करीत आहे आणि आतातर प्रत्यक्ष नेटकर (मुख्यत्वाने मराठी) लोकांची मराठी संवर्धनाची कास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाती घेतली आहे. आता सर्वपरिचित , मुख्यत्वेकरून ट्विटर वापरकर्त्यांना माहीत झालेले आहे, कि सर्व मराठी नेटकर लोक मराठीच्या डिजिटल पटलावरपण ते भाषेच्या बाबतीत सजग झाले आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. डिजिटल युगात ट्विटर सारख्या मोठ्या सामाजिक माध्यमातून मराठी लोकांनी आणि काही विशेष मराठी ट्विटर वापरकर्त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 'पहिले मराठी ट्विटरसंमेलन' आयोजित केले आहे. तसं म्हणायला गेलं तर हे 'पहिले जागतिक मराठी ट्विटरसंमेलन' आहे कारण जगाच्या पाठीवर मराठी भाषेचा पुरस्कृतपणे वापर करणारे भारत हे एकमेव आणि एकच राष्ट्र आहे आणि त्यात महाराष्ट्र हे मराठीवर स्वामित्व असलेले राज्य.
इथे मला हेच सांगायला खूप आनंद होत आहे कि वाढत्या तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येकच लोकांना त्यांच्या भाषेच्या विषयी चिंता होऊ लागली आहे आणि हे होणे साहजिक आहे व त्यासाठी ते भाषेच्या जपणुकीचे आटोकाट प्रयत्नही करीत आहेत.यात आपणही काही मागे नाही. पण इथे सांगण्यासारखे हेच एक डिजिटल माध्यमांतून व तंत्रज्ञानाचाच पुरेपूर वापर करून भाषासंवर्धन करणे हि कल्पना मराठी माणसाला सुचणे हे विशेष. याआधी अशा प्रकारचे संमेलन बाकी भाषेत व इतर देशांत झालेले आहे असे सध्यातरी वाचण्यात व ऐकण्यात आलेले नाही. कदाचित ते झालेलेही नसेल. म्हणून आपल्या मराठी लोकांनी राबवलेला हा उपक्रम जागतिक स्तराचा आहे.
डिजिटल युगात इंग्रजीला बाजूला ठेवून पुन्हा मराठीकडे जोमाने परतीचा प्रवास करणे हे खूप प्रसंशनीय. हे ट्विटरसंमेलन आजपासून १८ जानेवारी पर्यंत अविरत सुरु राहणार आहे. यास कुणाचे दडपण नाही अथवा वेळेचे बंधन नाही. आयोजकांनी दिलेल्या बारा विषयांवर बोलतांना जाणवते कि मराठी माणसाकडे विपुल  साहित्यसाठा, वैचारिक लिखाण, कविता, लेख, ब्लॉग यासारख्या गोष्टी जिवंत आहेत. लोकही यास प्रतिसाद देत आहेत आणि असाच प्रतिसाद उरलेल्या दिवशी पण देणे गरजेचे आहे. या ट्विटरसंमेलनाचे उद्देश्य फक्त काही चार दिवसांपूरतेच मर्यादित नसून, हि ठिणगी आहे आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, आपुलकी आणि आपलेपणा निर्माण करणयाची. याचा पुढे प्रकाशपुंज होणे निश्चित आहे आणि यातून मराठीचे नवे भविष्य घडणेही निश्चितच आहे.
आज या मराठी संमेलनाचा पहिला दिवस होता. ट्विटरवर बघितल्यावर असं वाटत नव्हतं कि मी एक दरदिवशी वापरल्या जाणाऱ्या ट्विटरवर आहे तर मला भासत होते कि जणू ते एक साहित्यसंमेलनच आणि मी त्यात सहभागी होणे म्हणजे एक पर्वणीच. लोकांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता, आणि तो असाच पुढेही असेल हीच आशा.
इथे मी शेवटी मतितार्थ म्हणून हेच सांगू इच्छितो कि या अशा 'डिजिटल मराठी ट्विटरसंमेलनची' हि पद्धती एकदासाठीच नाही तर यावर्षीपासून अविरत त्याच्या आयोजनाचा प्रवास सुरु राहील. मात्र याचा अर्थ असा नाही कि या चार दिवसांना वगळून  बाकी दिवसांत मग अजून मराठीला वाळीत टाकून द्यावे. एक विंनती माझी हीच कि सर्व मराठी लोकांनी व ट्विटरबाबतीत ट्वीटरकरांनी जितकं जमेल तितकं सतत मराठीत आपले लिखाण व विचार इतरांपर्यंत पोहचवावे.
नक्कीच आशा आहे, या चार दिवसांत, लोकांच्या थांबलेल्या मराठी लिखाणाला पून्हा नवदालने मिळतील, पुन्हा लिहिणे सुरु होईल, कवितांचा बहर येईल, कुणी नवा कवी जन्मास येईल, कुणी लेखक होईल आणि कुणी अजूनकाही. मात्र एक मराठी वातावरण निर्मिती नक्कीच होईल. यातून जरी कुणास काही मिळाले नाही तरी आपण ट्विटरसंमेलनाचे, या मराठी संवर्धनाचे सहभागी आहोत आणि राहू हा मनस्वी आनंद नक्कीच मिळेल. शेवटी आयोजक आणि मराठी जपणाऱ्या लोकांना धन्यवाद. यात सहभाग घेत असलेल्या आणि घेणाऱ्या लोकांना शुभेच्छा आणि अभिनंदन.
शेवटी हे डिजिटल, तंत्रज्ञानयुगातील 'पहिले जागतिक मराठी ट्विटरसंमेलन' म्हणजे भाषाक्षेत्रातील "एक विक्रमी- पाऊलवाटच".
अर्थातच सारांश हाच कि....


"हे निमित्त एक भाषेला जपण्याचे,
यातून घडेल नक्कीच चांगले काही।
मराठी भाषा आहे अशी गोडीची,
जिचे प्रवास कधी थांबले नाही।।"

:- सागर बिसेन
@sbisensagar

No comments:

Post a Comment