Sunday, January 17, 2016

प्रवास पहिल्या 'अँड्रॉइडपर्यंतचा'

शिर्षकावरून असं काही वाटणार नाही तुम्हाला की यावरही काही लिहिण्यासारखं असतं म्हणून. होय खरंच! वाचताना यासंबंधी असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. असो तरीही मी लिहायचं म्हणून लिहितोय. तुम्हाला यावर काही सांगायच म्हणून सांगतोय. कदाचित उत्तरार्धाचा प्रवास तुम्हाला काही देऊन जाईल, सांगून जाईल.

आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या जगात माणसाला सर्व गोष्टींशी अवगत असणे खूप गरजेचे आहे. आणि मग हे सर्व जग जाणून घेताना आपल्याला काही साधनांची गरज असते. जग आज झपाट्याने बदलत आहे, सर्व काही सेकंदात बदलत आहे आणि संपूर्ण मानवजातीला या बदलांना आता आत्मसात करून घ्यायचं आहे. मग ह्या सर्व परिस्थितीशी जुडवून घेण्यासाठी आपणास काहीतरी सोबत हवे ना? जगाच्या बदलांसोबत आपण स्वतःला अवगत करण्यासाठी खूपशा उपकरणांचा उपयोग करत असतो. दिवसेंदिवस या उपकरणांत भर पडत आहे.

इंटरनेटच्या युगात मोबईल हे असेच एक उपकरण अथवा यंत्र आहे जे आपल्याला जगाशी जोडत असते. म्हणायला गेलं तर मोबाईल हेच प्राथमिक स्तरावरील तंत्रज्ञान म्हणून समाजात रुजलेले एक साधन आहे. आज वर्तमान युगात मोबाईलपण असंख्य प्रकारचे आले आहेत, आणि सारखे त्यांमध्ये बदल होत असतात. माणसाला त्यांच्या आवडीनिवडी नुसार जोडत असतात, जगणे सुकर करत असतात आणि इंटरनेटच्या सोबतीने जग जवळ आणून देतात.
आपली पिढी हि संगणक युगात, इंटरनेटच्या काळात व तंत्रज्ञानाच्या झोतात जगणारी पिढी आहे. इथे मोबाईल प्रत्येक दिवशी नवा रूप घेतो. मी इथे सांगत आहे अशाच माझ्या(ग्रामीण भागातील विचारांतून) मोबाइलची एक कथा.

शाळेतील शिक्षण पूर्ण होतपर्यंत तरी मोबाईल आमच्या हातात नव्हताच आणि ते माझ्यामते एकप्रकारे चांगलेच होते. आम्ही जेव्हा अकरावी किंवा बारावीला होतो (आमच्या कानी त्यावेळी हे माहित झालं म्हणून) तेव्हा काय ते देशात 'अँड्रॉइड' या प्रकारच्या मोबाईलचे पदार्पण झाले होते. त्याआधी मोबाईल काय, तर फक्त दोनच प्रकारचे मला माहित होते, ते म्हणजे एक 'साधा' आणि दुसरा गाण्यांवाला "मल्टिमिडीया". त्यावेळी मल्टिमिडीया ची छाप जास्त होती. फोटो आणि गाणे ऐकता येतात व थोडंफार नेट चालवता जमते म्हणून त्या मोबाईलचे कौतुक वाटायचे. माझंही असंच होतं. कॉलेजला सुरुवात केली ती नोकियाच्या मल्टिमिडीया सोबत. मुळात मल्टिमिडीया किंवा मागील दोनचार वर्षे डोकावून  बघितलं तर कळेल कि नोकिया म्हणजे मोबाईलची एक वेगळीच दुनिया. आमच्या गावात तरी प्रत्येकी दहा मधून सात लोकांकडे तेच सापडायचे आणि आताही सापडेलच कदाचित. 

हाच नोकिया माझ्याकडे पहिला मोबाईल म्हणून हाती आला. आता आपण कॉलेजला जाणार म्हणून  नवीनच मोबाईल घेतला पाहिजे असं काही नाही तर घरी वापरातच असलेला एक मी सोबत घेऊन आलो. हळूहळू त्या मोबईलशी जुळत गेलो, जुळवून घेतलं आणि कालांतराने तो मोबाईल मलाच कसा प्रिय वाटू लागला हे मलाच कळले नाही. ज्याप्रकारे आपल्या आवडत्या वस्तूला आपण जपून जपून ठेवत असतो त्याचप्रकारे मी त्या मोबाईलचं करायचो. बघायला गेलं तर तो दिसण्यात जुनाच होता. त्या मोबाईलचे कौतुक वाटून घेण्याचे कारण म्हणजे एकच कि ते मोबाइल नोकिया कंपनीचं पहिलं थ्री-जी मोबाईल. आधी हेही मला काही माहित नव्हते, कॉलेजला आल्यावर कळले कि आपला मोबाईल थ्री-जी आहे म्हणून. आता गावात कुठे बरोबर नेटवर्क? ते असंच चालत असते आपलं हळूहळू. जेव्हा शहरात शिकायला आलो तर मोबाईलवर टॉवर थ्री-जीचे  दाखवायचे.  तेव्हा कुठे माहित झालं कि आपला मोबाईल थ्रीजी आहे म्हणून. प्रत्यक्षात ते फक्त दिखावा म्हणून सांगायला थ्रीजी होते. आजपर्यंत मी कधी थ्रीजी रिचार्जही केला नाही. इथे बॅलन्स मारायला दहादा विचार करावा लागतो आणि ते तर अक्षरशः नेटचे होते. आतातर ते मोबईल अजूनच आपलेसे वाटू लागले होते. इतरांच्या तुलनेत तरी, मी त्यावरच सर्वकाही, मुख्यत्वेकरून करून मराठीत जलद लिहायला शिकलो, फेसबुक, ट्विटर वापरायला शिकलो. आता अजूनच त्या साध्याशा मोबाईलचे कौतुक वाटते होते.

बघा सांगता सांगता कुठे पोहचलो मी. असो. मग कॉलेजला गेल्यावर हळूहळू जाणवले कि लोकांकडे  स्क्रीनटच व मोठ्या सक्रीनवाले  मोबाईल येऊ लागले होते. आणि तेच होते 'अँड्रॉइड'. सर्व मुले एकमेकांना बघून तेच घेऊ  लागली होती, तंत्रज्ञानाच्या चर्चांचे पीक पिकू लागले, नवनवे ब्रँड मार्केटमध्ये आले. लोक फेसबुक, ऑर्कुट, ट्विटर सोडून डायरेक्ट व्हाट्सअप, वीचाट, हाईक, स्काईप यावर उडी मारून बसले. हे सर्व बघताना छान वाटत होते मात्र त्यांची किंमत चार  ते पाच आकडी मध्ये डोलत आहे हे बघताना प्रश्नही मनी ओढत होते. तसं आजच्या युगात मोबाईल शिवाय जगणे म्हणजे मग आपल्याच जगात मर्यादित जगणे असे आहे. जर या युगात आपल्या जगाच्या पलीकडे डोकावून बघायचे असेल तर आज सर्वांना मोबाईलची गरज आहे आणि एका चांगल्या अँड्रॉइडची गरज आहे. हळूहळू आता सर्वांजवळ क्लासमध्ये अँड्रॉइड आले होते, त्यावरील खेळ रूढ झाले होते, सगळे वेगळेच  वाटत होते. यात मग नाही म्हंटल तरी माझ्यासारख्या एका ग्रामीण मुलाच्या मनात आपल्याकडेही असे काही असावे हि अधून मधून इच्छा जागृत होत होती व क्षणांतच विरतही होती.

शेवटी वाटायचे कि आपल्याकडे आहे तेच छान आहे. कारण यावर मराठीत फास्ट लिहिता येत होते, चांगल्याने नेट चालत होते, मग उगीच कशाला त्याची मागणी घालायची. असे माझ्यासारखे बाकी अजून खूप होते म्हणा, मात्र त्यांच्या तुलनेत माझा मोबाईल बरा होता.  नंतर
दोन -अडीच वर्षे झाली, आता मोबाईल जुना होत गेला होता, अँड्रॉइडची आकांक्षा मनात जन्म घेत होती, पण आपल्या जवळ मोबाईल असताना दुसऱ्याची मागणी करणे म्हणजे आम्हां सामान्य घरातल्या मुलांना थोडे अवघडच. सरळ मोबाईल हवा असा प्रश्न  मी घरच्यांना करू  शकत नव्हतो आणि त्यांना तर या गोष्टींबद्दल कणभरही माहित नव्हते, मग ते मला कसे बोलणार होते. इथे मी हे सांगण्याचं उद्देश्य हेच कि आयुष्यात काही गोष्टी शक्य असतात पण त्यासाठी विनाकारण मग बंदोबस्त करावा लागतो. समोरच्या माणसाला अशी मागणी हट्ट असल्यासारखी भासत असते.  मी मनात निर्धार केलं, आपण अँड्रॉईड तेव्हाच घेवू जेव्हा आपल्याकडे मोबाईल नसेल किंवा आपले घरचेच स्वताहून परवानगी देतील तेव्हा. तसं घरी आधीच बाकी 'मल्टिमिडीया' असताना नवीन घेणं म्हणजे काहीसं अडखळल्यागतच होत असते.म्हणून हे सगळे एका मोबाईलमागचे रामायण.  म्हणून मी तिथेच थांबलो होतो. शेवटी काहीतरी कल्पना नसलेलेच घडले.

गेल्या वर्षीची गोष्ट, अचानकच एके रात्री माझा मोबाईल चोरीला गेला आणि सोबत दोन मित्रांचे मोबाईपण. आता चोराला त्या मोबाईल मध्ये असे काय दिसले माहित नाही जो त्याने तो चोरून नेला. अड्रॉइडच्या युगात त्याने माझा मोबाईल का चोरला  हे त्याचे  तोच जाणे. शेवटी प्रयत्न केलेत पण तो काही मिळाला नाही. आता त्याचा विषयच मी सोडून दिला होता आणि आता त्या उपकरणावर असलेले माझे प्रेम आणि त्यामुळे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी या मनातून मला त्या मोबाईलची तरी सतत आठवण करून देतात.

घरी हे सर्व बोललो होतो. काही दिवस मोबाईल गेल्याचा शोक जाणवला. मग व्यवस्थित झाले. आता मला मोबाईल हवा होता. तसं काही महिने हे मी मोबाईलविणाच काढले . मात्र आता पूर्ण तयारी  झाली होती मी अँड्रॉइड घ्यायचं म्हणून मात्र तो कधी हे काही ठरलेले नव्हते. स्वतः बाबा  हजार बाराशे चा मोबाइलला कित्येक वर्षांपासून वापरत आहेत (व तो नवीनच अजूनही) आणि मी त्यांना हजाराच्या घरातल्या मोबाईलची मागणी कशी करावी हाच मोठा प्रश्न होता. मुळात आई बाबा नकार देतील असे होणार नव्हतेच आणि प्रत्येक आई बाबा  आपल्या मुलांच्या गरजांना पूर्ण  करतातच. मात्र त्या साठी माझ्याजवळ कारण हवे होते, घरी साधे मोबाईल असताना ते न वापरता नवीन अँड्रॉइड मोबाईलची मागणी का हे त्यांना समजवायचे होते जेणेकरून ते काही बोलणार नाहीत. तसं आमच्या सारख्या गावातल्या लोकांना मोबाईलचा असला काही नाद नसतोच, मात्र आता गरज म्हणून आणि आपल्याकडे असावं अँड्रॉइड म्हणून हि मागणी.

नवा मोबाईल घेण्यासाठी मी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला. बाबांनापण आता कळून चुकलं होतं कि मला नवा मोबाईल गरज म्हणून घेऊन द्यावा म्हणून, मात्र मीच परिस्थितीला पाहत बोलत नव्हतो. कारण एकसोबत एका मोबाईल मध्ये इतके पैसे गुंतवणे म्हणजे आमच्या सारख्या लोकांना थोडे अवघडच. मुळात घेणे सहज शक्य होते, एका दिवसात होणार होते मात्र त्यामागे होणारा खटाटोप आणि आर्थिक चिंता व मग कुठूनतरी मागणी ह्या गोष्टी जास्त समजून घेण्याच्या असतात. त्यामागे होणारा त्रास आणि विचारसरणी लक्षात घ्यावी लागते. आपल्याला हाताळायला म्हणून काही गोष्टी हव्या असतात पण त्या मिळवण्यासाठी ज्याचे कष्ट आणि श्रम असते ते खूप मोलाचे असते.

शेवटी दिवाळीचे दिवस आले. तसं सांगायला इथे मला नको पाहिजे पण सांगतो, दिवाळीला शहरात खरेदी, खर्च, झगमग असते, मात्र असली काही प्रथा गावात नसतेच. लोक  आपल्या आर्थिक पाठबळावर आनंदात दिवाळी साजरी करतात. पेपरात येणारी खरेदी, लोक म्हणतात तशी शॉपिंग आणि सिनेमात दाखवतात तसली दिवाळी नसते लोंकांची इथे. इथे दिवाळी नैसर्गिक असते, सहृदयतेची  असते. मात्र आमच्या सारखे काही बाहेरची हवा खातात आणि गावात फक्त दिखावा करतात. असो, शेवटी दिवाळीच्या निमित्ताने एकदाचं सर्वांना बोलून , तीनदा विचारून , बाबांच्या सहमतीने आणि आज्ञेने मी मोबाईल एकदाचा घेतला. आणि खास अविस्मरणीय म्हणजे तो माझ्या 'आईच्या वाढदिवसाला' घेतला.  तसं तर आम्ही लोक आपलाही वाढदिवस साजरा करत नसतो. आईचे वाढदिवस तर मग दूरच. आताच काहीएक वर्ष झालेत तर मित्र मिळून आम्ही आपला वाढदिवस साजरा करायला शिकलोत आणि ते फक्त मित्रांमुळे. मोबाईल घेतल्याचा आनंद मनात होता मात्र  आईच्या वाढदिवसाचे ते  निमित्त या आठवणीने तो क्षण अजूनच मनात कोरून बसलाय आता कायमचा. आणि हाच होता माझा "अँड्रॉइड घेण्यापूर्वीचा प्रवास." सरळ होता मात्र विचारांचा होता, बिकट होता पण छान होता.
माझे वर्तमान तंत्रज्ञानाला एकदा धन्यवाद कि हे सर्व मी त्यामुळेच लिहू शकलो आहे.

लेखन:-  सागर सा. बिसेन
              ९४०३८२४५६६

Friday, January 15, 2016

एक विक्रमी पाऊल- मराठी ट्विटरसंमेलन

"जिथे प्रवासाचा अंतच नाही,
तिथे कुणी कसं संपणार।
सज्ज झालोत पुन्हा आम्ही,
आता मराठीसाठी हरकुणी झुंजणार।।"
सर्वांना माहित आहे आजचे जग हे धकाधकीचे आहे, धावपळीचे आहे, जिथे लोकांना श्वास घ्यायला आणि निःश्वास सोडायला पण फावला वेळ मिळत नाही. मग यात आपण आपल्याला हरवून बसतो तर कधी कधी आपल्याशी निगडित असलेल्या वस्तूंना हरवून बसतो. मुळात त्या आपल्याला हव्याच असतात, त्यविना आपले जगणे काहीशे अर्धवटच असते आणि हे सर्व घडूनही जाते तरी आपल्याला त्या गोष्टींचा हरवण्याचा पत्ताही लागत नाही. मग कधीतरी आपल्याला जाग येते, आपलेपण शोधण्याची वेळ येते आणि आपले स्वतंत्र  अस्तित्व व्हावे असे वाटू लागते त्यावेळी आपण त्या गोष्टीला शोधण्याचा, पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी अथक प्रयत्नांतून ती गोष्ट आपल्याला कालांतराने परत भेटतेही आणि आपल्या जीवात जीव येतो.
मी इथे बोलतो आहे अशाच एका गोष्टी बद्दल, आणि ती गोष्ट आहे 'भाषा'. आजचे वर्तमान युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे आणि सर्व गोष्टी आता झपाट्याने घडत आहेत, क्षणार्धातच परिस्थिती बदलत आहे. याच विज्ञान युगामुळे लोकांमध्ये ज्ञानाचीही भर पडली आहे. मात्र प्रत्येक गोष्ट फायद्याची असते तसे तिचे काही तोटेही असतात. प्रत्यक्षात मी विज्ञानाला तोट्याच्या कटघऱ्यात उभा करणार नाही मात्र कुठेतरी प्राथमिक गोष्टींना (जसे स्थानिक भाषा)यामुळे ठेच लागत आहे. मुळात ती ठेच तंत्रज्ञानाची नसून, वाढत्या इंग्रजी चलनाची आहे. आज प्रत्येकच कामे ही इंग्रजीमधून आकर्षणाचे केंद्र असल्यासारखी होत आहेत. आयुष्य जणू त्यावरच अवलंबून आहे कि काय असं होतंय कधी कधी. मात्र वास्तविक बघायला गेलं तर असं काही नाही. माणूस आपल्या मातृभाषेतही पारंगत होऊन किंवा तिचा अवलंब करून जगू शकतो आणि आपले आयुष्य घडवू शकतो. मात्र त्यासोबतच इतर भाषाही माणसाला याव्यात आणि सध्यास्थितीत त्याची गरजही आहे. एका भाषेच्या सम्पूर्ण ज्ञानासोबत बहुश्रुत होणे हि आज काळाची गरज आहे.
वर्तमान युगात इंग्रजी भाषेचे चलन वाढले आहे त्यामुळे आपल्या स्थानिक भाषेच्या अस्तित्वावर नकळतच प्रश्नचिन्ह उभा होतो. प्रत्यक्ष बघायला गेलं तर आपण सर्वाना माहित आहे कि भाषा हि माणसांना जोडण्याचं काम करते, आणि तिला जर माणूस हरवून बसला तर आपले एक भाषिक अस्तित्वही आपण मग कुठे तरी स्वतःच हरवून बसतो. आपल्या माय मराठी भाषेचंही असंच होत आहे. वाढत्या इंग्रजीच्या उपयोगाने आणि आधुनिकतेच्या वाढत्या जथ्याने आपल्या मराठी भाषेवर मळभ निर्माण झाले आहे. म्हणून आपल्या भाषेला या जडवादविषयक जगात जपून ठेवणे हा गांभीर्याचा विषय आहे.
तंत्रज्ञानाच्या आणि भरभराटीचा या युगात आपली भाषा मग काळाआड झालेली किंवा गडप झालेली आपल्याला आवडेल काय? जर मातृभाषेवर कुणाचे खरंच प्रेम व आपुलकी असेल तर प्रत्येकाकडून या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच येईल. आपल्या मराठीला जपणे हे आता आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य व्हायला हवे आणि बहुतांश लोकांचे ते झालेलेही आहे.
आता मुळात आपल्या भाषेला जपायचे तर ते कसे? यासाठी इंग्रजीचा वापर पूर्णताच सोडून देणे किंवा तिच्या वापराला विरोध करणे असा नाही. मात्र त्यामुळे आपल्या मराठीवर मात्र दगा येऊ नये हीच एक काळजी असावी. तंत्रज्ञान आज ,जगाचे रहस्य आपल्याला सांगते, जगणे घडवते आणि माणसाचे जीवन सुकर करते. यात मग आधुनिकता आहे म्हणून डोळ्यांवर काळीख लेपून तंत्रज्ञान हे धोक्याचे आहे असे म्हणणे किंवा त्याचा वाममार्गाने  सतत विरोध करणे म्हणजे एक मूर्खपणाच.
आता गरज आहे ती भाषा संवर्धनाची आणि ते सर्व आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करूनच करावं लागेल. शीर्षकास अनुसरून बोलताना, लिहिताना आणि ते लिहिण्याच्या अगोदरच आता आपल्याला वाचताना कळले असेल कि सध्या गाजत असलेले ट्विटरसंमेलन हे याचेच एक सर्वोत्तम आणि सूचक असे उदाहरण आहे. माणूस विज्ञानाच्या जोडीने खूप प्रगती करीत आहे आणि आतातर प्रत्यक्ष नेटकर (मुख्यत्वाने मराठी) लोकांची मराठी संवर्धनाची कास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाती घेतली आहे. आता सर्वपरिचित , मुख्यत्वेकरून ट्विटर वापरकर्त्यांना माहीत झालेले आहे, कि सर्व मराठी नेटकर लोक मराठीच्या डिजिटल पटलावरपण ते भाषेच्या बाबतीत सजग झाले आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. डिजिटल युगात ट्विटर सारख्या मोठ्या सामाजिक माध्यमातून मराठी लोकांनी आणि काही विशेष मराठी ट्विटर वापरकर्त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 'पहिले मराठी ट्विटरसंमेलन' आयोजित केले आहे. तसं म्हणायला गेलं तर हे 'पहिले जागतिक मराठी ट्विटरसंमेलन' आहे कारण जगाच्या पाठीवर मराठी भाषेचा पुरस्कृतपणे वापर करणारे भारत हे एकमेव आणि एकच राष्ट्र आहे आणि त्यात महाराष्ट्र हे मराठीवर स्वामित्व असलेले राज्य.
इथे मला हेच सांगायला खूप आनंद होत आहे कि वाढत्या तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येकच लोकांना त्यांच्या भाषेच्या विषयी चिंता होऊ लागली आहे आणि हे होणे साहजिक आहे व त्यासाठी ते भाषेच्या जपणुकीचे आटोकाट प्रयत्नही करीत आहेत.यात आपणही काही मागे नाही. पण इथे सांगण्यासारखे हेच एक डिजिटल माध्यमांतून व तंत्रज्ञानाचाच पुरेपूर वापर करून भाषासंवर्धन करणे हि कल्पना मराठी माणसाला सुचणे हे विशेष. याआधी अशा प्रकारचे संमेलन बाकी भाषेत व इतर देशांत झालेले आहे असे सध्यातरी वाचण्यात व ऐकण्यात आलेले नाही. कदाचित ते झालेलेही नसेल. म्हणून आपल्या मराठी लोकांनी राबवलेला हा उपक्रम जागतिक स्तराचा आहे.
डिजिटल युगात इंग्रजीला बाजूला ठेवून पुन्हा मराठीकडे जोमाने परतीचा प्रवास करणे हे खूप प्रसंशनीय. हे ट्विटरसंमेलन आजपासून १८ जानेवारी पर्यंत अविरत सुरु राहणार आहे. यास कुणाचे दडपण नाही अथवा वेळेचे बंधन नाही. आयोजकांनी दिलेल्या बारा विषयांवर बोलतांना जाणवते कि मराठी माणसाकडे विपुल  साहित्यसाठा, वैचारिक लिखाण, कविता, लेख, ब्लॉग यासारख्या गोष्टी जिवंत आहेत. लोकही यास प्रतिसाद देत आहेत आणि असाच प्रतिसाद उरलेल्या दिवशी पण देणे गरजेचे आहे. या ट्विटरसंमेलनाचे उद्देश्य फक्त काही चार दिवसांपूरतेच मर्यादित नसून, हि ठिणगी आहे आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, आपुलकी आणि आपलेपणा निर्माण करणयाची. याचा पुढे प्रकाशपुंज होणे निश्चित आहे आणि यातून मराठीचे नवे भविष्य घडणेही निश्चितच आहे.
आज या मराठी संमेलनाचा पहिला दिवस होता. ट्विटरवर बघितल्यावर असं वाटत नव्हतं कि मी एक दरदिवशी वापरल्या जाणाऱ्या ट्विटरवर आहे तर मला भासत होते कि जणू ते एक साहित्यसंमेलनच आणि मी त्यात सहभागी होणे म्हणजे एक पर्वणीच. लोकांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता, आणि तो असाच पुढेही असेल हीच आशा.
इथे मी शेवटी मतितार्थ म्हणून हेच सांगू इच्छितो कि या अशा 'डिजिटल मराठी ट्विटरसंमेलनची' हि पद्धती एकदासाठीच नाही तर यावर्षीपासून अविरत त्याच्या आयोजनाचा प्रवास सुरु राहील. मात्र याचा अर्थ असा नाही कि या चार दिवसांना वगळून  बाकी दिवसांत मग अजून मराठीला वाळीत टाकून द्यावे. एक विंनती माझी हीच कि सर्व मराठी लोकांनी व ट्विटरबाबतीत ट्वीटरकरांनी जितकं जमेल तितकं सतत मराठीत आपले लिखाण व विचार इतरांपर्यंत पोहचवावे.
नक्कीच आशा आहे, या चार दिवसांत, लोकांच्या थांबलेल्या मराठी लिखाणाला पून्हा नवदालने मिळतील, पुन्हा लिहिणे सुरु होईल, कवितांचा बहर येईल, कुणी नवा कवी जन्मास येईल, कुणी लेखक होईल आणि कुणी अजूनकाही. मात्र एक मराठी वातावरण निर्मिती नक्कीच होईल. यातून जरी कुणास काही मिळाले नाही तरी आपण ट्विटरसंमेलनाचे, या मराठी संवर्धनाचे सहभागी आहोत आणि राहू हा मनस्वी आनंद नक्कीच मिळेल. शेवटी आयोजक आणि मराठी जपणाऱ्या लोकांना धन्यवाद. यात सहभाग घेत असलेल्या आणि घेणाऱ्या लोकांना शुभेच्छा आणि अभिनंदन.
शेवटी हे डिजिटल, तंत्रज्ञानयुगातील 'पहिले जागतिक मराठी ट्विटरसंमेलन' म्हणजे भाषाक्षेत्रातील "एक विक्रमी- पाऊलवाटच".
अर्थातच सारांश हाच कि....


"हे निमित्त एक भाषेला जपण्याचे,
यातून घडेल नक्कीच चांगले काही।
मराठी भाषा आहे अशी गोडीची,
जिचे प्रवास कधी थांबले नाही।।"

:- सागर बिसेन
@sbisensagar