Friday, July 24, 2015

सावरकरी विचार आणि समाज

"जयोस्तुते ! जयोस्तुते !
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे'
स्वतंत्रते भगवती, त्वामहम यशोयुतां वंदे !"
मातृभूमीच्या प्रेमासाठी व् आपल्या प्राणाचे सर्वस्व मायभूसाठी त्याग करणाऱ्या साहसी व प्रचंड धाडस असलेल्या पराक्रमी माणसाच्या ओठी आलेले हे उद्गार आहेत.  ही तीच व्यक्ती आहे जे  लोकांची टीका , इतरांचे बोलणे मनावर न घेता स्वतः आपल्या कर्तृत्वाची बीजे पेरुन  लढले. तोपर्यंत लढले  जोपर्यंत त्यांच्या  प्राणाची ज्योत तेवत होती. प्रचंड साहस , प्रगल्भ बुद्धिमत्ता, विधिविख्यात, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे वर्णन आहे.
भारतीय राज्यव्यवस्था ज्यावेळी पारतंत्र्याच्या  बेड्यांत अडकली होती  तेव्हा अनेक शूरवीर व देशभक्तांच्या श्रेणीत असे हे एक तेजस्वी व् सर्जनशील कवी  जन्मास आले . त्यांनी सम्पूर्ण स्वातंत्र्यसमराचेच काव्य आपल्या हाताने रेखाटले . परकियांच्या जुलुमाला न जुमानता , न  घाबरता हे चालतच  राहिले आणि लढतच राहीले.
वीर सावरकर
प्रथमच मी  हे ज्यावेळी हे लिहिण्यासाठी तयारी करीत  होतो,त्यावेळी एक मित्राचा प्रश्न आला, 'कशाला  जुन्या माणसांच्या शोधात लागलास ? आता जसे  आहे ते जगू दे , वर्तमान बघ."  नक्कीच! का नाही? त्याच्या आधुनिक विचारांनी तो बरोबर बोलला आणि यात काय  राखून आहे,जुन्या गोष्टी उकरून काढण्यात. मात्र हा त्याचा  बचावात्मक  मार्ग झाला आणि मला ह्या आधुनिक प्रकाशात अजूनही  कुठेतरी अंधार आहे याची प्रचीती झाली. असो पण कित्येक लोकांना माहितीही  नसेल  की हे  "स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते? का होते?" कारण त्यांना जाऊन आता पाच  दशके पालटून गेलीत . पण याचा अर्थ असा होत नाही कि त्यांची कीर्ती  इतरांपर्यंत पोहचायला नको.
समाजशील  व विचारशील दृष्टीने बघितले तर लक्षात येईल की 'सावरकरी विचार व आपला समाज' यांच्यात आजही तफावत आणि वाद आहे. अनेक मतभेद आहेत आणि वैमनस्याचे वारे अजूनही जन्म घेत आहेत. प्रत्येक माणसाकडे आज वेगळा कारण आहे, वेगळा इतिहास हाती आहे. आज स्वतःच माणूस असमंजस  आहे  की खंर काय आणि खोटे काय ते. मनाला स्थिर ठेऊन व एकत्रितपणे अभ्यास केल्यावर हे आपल्याला नक्कीच कळून येईल की या सर्व वादांमध्ये  एक स्वार्थसिद्धता आणि आपसुकतेचा हेतू आहे. आपल्या खुर्च्या कशा  वर उंचवायच्या आणि इतरांचे अस्तित्व कसे दाबून ठेवायचे हि  आजच्या समाजाची मेख आहे. १८८३ च्या मध्यात जन्मलेले  हे व्यक्तिमत्व वयाच्या तेराव्या वर्षी  " देशाच्या  स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून, मारीत मारीत मारितो झुंजेन " अशी भयानक प्रतिज्ञा करू शकले  तर समजून घ्या कि  त्याच्या उत्तरार्धात त्यांनी आपले आयुष्य कसे वेचले असेल?
पहिल्यांदाच प्र. के. अत्रेंनी ज्यांना  'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी दिली ते  स्वातंत्र्यसैनिक, तीव्र बुद्धिमत्ता लाभलेले, आक्रमी व साहसी वृत्ती असलेले, हृदयातील मानव्य आणि सर्जनशील कवित्व लाभलेले,एक मराठी भाषेतील  कवी, लेखक, समीक्षक होते . सावरकरांच्या लेखणीतून जणू आगच बाहेर  पडत होती जी इंग्रजांना हादरून लावायला पुरेशी ठरली. यांच्या  लिखाणांवर प्रकाशित होण्याआधीच बंदी आणली गेली, वकिलीची पदवी रोखण्यात आली . देशाच्या लढ्यात फासावर लटकून अमर होणाऱ्या  क्रांतिकारकांना बघून ते तळमळले  व त्यातूनच त्यांनी  स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.
सामाजिक व स्वतंत्रतेची लढाई सुरु असतानाच सावरकरांच्या हिंसक व सशस्त्र लढ्यामुळे देशांत त्यावेळी काहीसे विरोधी वारेही  गुंजले. हिंदुत्त्ववाद हा मुख्य प्रश्न निर्माण झाला . त्याकाळची स्थिती पाहत सावरकरांनी भविष्याला बघुनच हिंदुत्त्वाची संकल्पना मांडली होती. आजही 'सावरकरी विचार आणि आपला समाज' यात तफावत दिसून येते. हिंदुत्ववादी  विचारसरणीतून सावरकर एकजिनशी राष्ट्र उभारू इच्छित होते मात्र कालारुपाने त्यांच्या विचारांचा विपर्यास करण्यात आला आणि देशांत विरोधी होऊ लागला. आज वर्तमान भारतीय समाजाची स्थिती यामुळेच  कुठे तरी अडकली आहे. सकारात्मकता आणि समजूतदारपणा ह्या गोष्टी फक्त बोलायच्या तेवढ्या राहिलेल्या आहेत. आपल्या वर्चस्वाला सिद्ध करण्यातच समाज गुंतलेला असून यात मग आपल्या जीवाचे त्याग करून मायभूमीसाठी लढणारे मात्र  दूरच राहीलेत.
इतिहास व सावरकरांचे चरित्र वाचल्यावर  कळते कि सावरकरांची हिंदुराष्ट्राची त्या काळची भूमिका काय होती. दूरदृष्टी प्राप्त असलेल्या सावरकरांना  तेच त्याकाळी दिसलं  होत जे आपण आज प्रत्यक्षात पाहत आहोत. सावरकरांना वाटायचे कि इंग्रज एकदाचे आपल्या भारताला सोडून तर जातील मात्र या देशांतील मुस्लिम बांधव जर आपल्या स्वतंत्र अस्तीत्वासाठी  जागे झाले तर देशात माणुसकी लोप पावेल . हिंदू व मुस्लिम ही  दोन स्वतंत्र राष्ट्रक आहेत व ते एकत्र राहू  शकत नाहीत . म्हणून मुस्लीमांसाठी व हिंदूंसाठी त्यांच्या स्वतंत्र उद्धारार्थ स्वतंत्र राष्ट्र हवे. हीच हिंदुराष्ट्र स्थापण्याची सावरकरांची विचारधारा होती. याचा कुठे कुठे विरोधही  झाला.
दुसरीकडे भारतीय समाजात बहुसंख्य हिंदू होते व ते जो हिंदू धर्म मानत होते तो सर्वसमावेशक व बहुविधता असलेला होता व आजही आहे. उलट हिंदू धर्माची हि वैशिष्ट्ये हेच देश कमकुवत होण्याची मुळ कारण आहेत  अशी सावरकरांची धारणा होती . हिंदूंचं एकजिनशीपण आणि त्याद्वारे येणारे कडवेपण हे सावरकरांचे उद्दिष्ट होते.
आता उद्भभवलेल्या आपल्या भारतीय समाजाची स्थिती आणि  सावरकरांनी नमूद केलेली समस्या यांच्यात खूप काही फरक नाही,मात्र त्यावेळी समाजातीलच काहींनी आपले अस्तित्व उभरून यावे त्यासाठी त्यांचा विरोध केला. वर्तमान भारतात  होणारे दंगे, हिंसाचार, दहशतवाद हि सर्व त्याचीच मुळ  कारणे आहेत. जरी आज हिंदू धर्माची सर्वसमावेशकता असली तरी ती वाखाणण्याजोगीच आहे मात्र त्याकाळी परिस्थिती वेगळी होती . स्वातंत्र्यविरांनी परकीयांचे भारतावर आक्रमण व सत्तास्थापनाचे कारण स्पष्ट करतानी सांगितले की 'भारत परकीय आक्रमणाला बळी पडला तो हिंदू समाज एकजीनशी नव्हता त्यामुळे, हा समाज कमजोर बनल्या यामुळेच .' त्याकाळी हिंदूंना हिंदुधर्म म्हणजे हिंदुत्व नव्हे, इतर किताबी धर्मांप्रमाणे हिंदू धर्माला एका साचेबंद चौकटीत बसवण्याचा प्रयत्न म्हणजे हिंदुत्वाचा विचार अशी संकल्पना नव्हती. हिंदुत्वाची संकल्पना सावरकरांच्या दृष्टीने वेगळी  होती,मात्र आपल्याच समाजाने त्याला बांधून  घेण्याचं बोलघेनं काम केलं . प्रत्येकाला  स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होऊन सुखात नांदण्याचा हा प्रयत्न असताना समाजधुरीणांनी त्याची वाट वेगळीच लावली. प्रत्यक्ष इतिहास वाचल्यावर कळेल कि प्राचीन भारतात हिंदू, मुश्लीम हि संकल्पना नव्हतीच. मात्र स्वातंत्र्याच्या उत्तरार्धात  हा स्वतंत्र अस्तित्वाचा प्रश्न उभ राहीला आणि त्यातच सावरकरांच्या सशस्त्र नीतीचा विरोध असलेल्यांनी त्यांच्या विरोधात वादळ उठवले. झुंजार नेतृत्व, अमोघ वक्तृत्व आणि भयानक वेदना आयुष्यभर सहन करणारे सावरकर अश्या गोष्टींना घाबरलेच  नाहीत. त्यांचे  राष्ट्रप्रेम अफाट होते  मात्र त्यांच्या विरोधाचे वारे काही समले नाही आणि ते वर्तमानात पण सामावलेत.
लोकसाहित्य  गृहाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या " साहित्यातील देशीवाद व समाजातील जातीव्यवस्था ' या ग्रंथातील पहिल्या प्रकरणावरून असेच  काही वास्तविक आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे हिंदुत्वाचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदू मुलतत्व वाद्यांप्रमाणेच आहेत फरक एवढाच आहे कि नेमाडे तो प्रादेशिक अंगाने करतात, तर हिंदू राष्ट्रवादी तो धर्माच्या आधारावर करतात. सावरकरांचा राष्ट्रवाद हा काहींसा नेमाडे यांचासारखाच  होता. सावरकरांनी जेव्हा हिंदुराष्ट्राची व्याख्या केली ती अशी
         " असिंधू सिंधूपर्यंत यस्य भारतभूमिका ।
           पितृभू: पुण्याभूश्चैव स वै हिंदुरीतीस्मृत: ।।"
भारतात प्रादेशिक राष्ट्रवाद आणि गोवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद यांच्यात नेहमी संघर्ष झालेला दिसतो. नेमाडे यांना सिंधू नदीच्या अलीकडील सर्व धर्म, वंश,जतिसमुह यांना हिंदू म्हणूनच मान्यता द्यायची होती तर सावरकरांच्या भूमिकेत पितृभूमीला  मान्यता देऊन. सावरकरांच्या हयातीतच त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाला रेखांकीत करण्यासाठी व समाजासाठी राखून ठेवण्यासाठी विसाव्या शतकाच्या तिसऱ्या  दशकात 'सदाशिव राजाराम रानडे' यांनी त्याचे संक्षिप्त चरित्र लिहिले. त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना सामाजिक कार्यकर्ते व् विचारवंत श्री. नरसिंह चिंतामन केळकर यांनी प्रभावीपणे उल्लेखनीय असा प्रकाश टाकला आहे.
"श्री सावरकर यांच्या पूर्व चरित्रावर त्यांनीच आपल्या अलिकडील जाणत्या उद्गारांनी पडदा टाकला असल्यामुळे, या पूर्व चरित्रास आता पदार्थ संग्रालयातील काचेच्या कपाटतील वस्तूंचे स्वरुप प्राप्त झाले  आहे. प्रत्यक्ष व् वर्त्तमान यांच्याशी सम्बन्ध न येणाऱ्या हक़िकतींकडे कोणीही निर्विकारपणे पाहू व बोलू शकतो. पण ही मनस्थिती केवळ  इतरांचीच असते अशी नाही तर स्वतः ज्याची त्याचीही असू शकते. मोठ्या माणसाला त्याच्या लहानपणीचा खोडकर स्थितीतला एखादा फोटो दाखवला  तर त्याची त्याविषयी जी भावना होईल तीच सावरकर यांची त्यांच्या पूर्वचरित्र संबंधाची आज असेल. समकालीन तरुण पिढीला त्यांचा हा देशभक्तिरत खोड़करपणा  अनुकरणीय नसला तरी स्पृहणीय वाटला खास.
पर्वताच्या भागात अशा काही जागा असतात की त्यावर पावसाचे पानी पडले आणि जर पूर्व समुद्रला जाऊन मिळाले तर जवळचे  एक बोट अंतरावर पडलेले पानी पश्चिम समुद्रला जाऊन मिळते व् प्रत्येकाला वेगवेगळ्या कीर्तीचे फळ  मिळते. पण त्यातल्यात्यात सावरकरांना मात्र दोन्ही मार्गाचा अनुभव व दोन्ही फळे लाभण्याचा संदर्भ मिळतो. पहिला म्हणजे क्रांतीकारक मार्ग त्यांनी चोखाळून संपवला व हिंदुस्थानाला स्वराज्याची घटना मिळाल्यामुळे यापुढे बंडाला अवसर पुरत नाही हे उद्गार त्यांनी काढल्यावरून त्यांच्या दुसर्या मार्गाचे आक्रमण  सुरु झाले."
अजून इथे हे नमूद करणे आवश्यक आहे कि कै. गोखले यांना सावरकरांचा हा बिनसनदशिरपणाचा जुना मार्ग शंभर टक्के नापसंत होता हे सांगावयास नकोच. पण तरीही त्यानी काही सावरकरांविषयी  प्रशंसापर उद्गार केळकर यांच्याकडे काढले होते.
युद्धानंतरच्या काळात लीग ऑफ नेशन्सच्या दरबारात हिंदुस्थानला आम्ही जागा दिली अशी बढाई सरकार मारते पण जहाजाच्या पोर्ट होल मधून समुद्रात उडी टाकून फ्रांस च्या धर्तीवर पाय ठेऊन इंटरनेशनल कायद्याची तक्रार सांगून "बोला हो बोला हो बोला हो, सर्व सभ्य बोला हो " असा सवाल सर्व राष्ट्रांना करून सावरकरांनी ते स्थान हिंदुस्थानला महायुद्धाच्या पाच वर्ष आधीच मिळवून दिले.
स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य काळात जन्मलेले जणू एक ज्वालामुखीच. स्वतः च्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेच स्वातंत्र्यासाठी प्राण वेचलेले हे पहिलेच उदाहरण. त्यांची हिंदुराष्ट्र संकल्पना वेगळी आहे. प्रत्येक समाज माणूस हा हेतुपरस्पररीत्या जगतोय. अर्ध्याहून जास्त समाज सावरकरांना विसरलाय ,मात्र अशा  क्रांतिकारी विचारांच्या वेळी त्यांचे नाव येतेच . कारण ते साहसी होते . वयाची ५० वर्षे जी व्यक्ती तुरुंगात राहिली , काळेपाणीची भयानक शिक्षा भोगली  पण त्याचे विचार मात्र थांबले नाहीत. दहा सहस्त्र ओळी तुरुंगाच्या भिंतींवर  कोरून, सह्कैद्यांना सोबत घेऊन आपल्या साहित्याला देशोपार पोहचवणारे , मृत्युला न घाबरता परकीयांची सत्ता हलवणारे  तेच हे   वि. दा. सावरकर. स्वातंत्र्याचे इतिहास लिहून जगात भारताला स्थान मिळवून देणारे  हे व्यक्तिमत्व   आज समाजाच्या वादातीत चर्चेचा विषय बनले  आहेत. विज्ञानयुगाच्या या जगात, समाजात नकारात्मक्तेला थारा न देता चांगले काय ते निरखून पाहावे व आपल्या आयुष्यात ओतून घ्यावे.
शेवटी आठवतात पुन्हा त्याच ओळी….
   "ने मजशी ने, परत मातृभूमीला ।
    सागरा प्राण तळमळला, प्राण तळमळला ….॥ "

संदर्भ:-
   १) लोकसाहित्य गृहाच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या  "साहित्यातील देशीवाद आणि समाजातील जातीव्यवस्था " या ग्रंथातील पहिले प्रकरण. divyamarathi.com मध्ये प्रकाशित.
  २) sawarkar.org  ह्या संकेतस्थळावरून माहिती वाचन.
  ३) mh-marathi.com/vinayak-damodar-savarkar
  ४) स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे संक्षिप्त चरित्र; सदाशिव  राजाराम रानडे
  ५) agniveerfan.wordpress.com
   ६) प्रकाश बाळ लिखीत 'मालेगाव खटला: कॉंग्रेसची भूमिका मतलबीच'
            ०२ जुलै २०१५ लोकमत प्रकाशित

Friday, May 1, 2015

महाराष्ट्रदिन निमित्ताने

"हे आयुष्य आहे काळानुसार चालणारे ,
सतत वेगात धावणारे, आता चालायचे आहे ।
जरी आली वाटेत काटे बोचणारी ,
मात्र सतत आता जिंकायचे आहे॥ "

प्राचीन काळापासून तर आजपर्यंत अनेक महान विभूतींनी व कित्येक विद्वानांनी या देशाला एक स्वर्णिम इतिहास दिला आहे व त्यात पावलोपावली यशाची शिखरे सुद्धा गाठण्यात आली व आताही गाठली जात आहेत. मग यात व या भारतवर्षाच्या यशोगाथेत महाराष्ट्राचे नाव प्राचीन युगातच कोरल गेले आहे. एक अत्यंत अजरामर व सुवर्णयुगाची परंपरा लाभेलेला  प्रदेश म्हणजे आपला "महाराष्ट्र" राज्य. या  मराठी मातीवर शूर अनेक  जन्मले, अनेक क्रांतिकारक जन्मास आले, अनेक पुढारी व संत उदयाश आले.आप ल्या महाराष्ट्राचा इतिहास हा भारतीय संस्कृती सारखाच खूपच जुना आहे. संत परंपरेपासून तर शिवरायांच्या व मराठ्यांच्या इतिहासापर्यंत, आणि स्वराज्यापासून तर मध्ययुगातील स्वतंत्रतासंग्रमापर्यंत, आणि मध्ययुगाच्या गाथेपसुन तर आजतागायत वर्तमान युगापर्यंत . प्रत्येक स्तरावर महाराष्ट्राला एक सुवर्ण इतिहास लाभला आणि याची प्रत्येक क्षणचित्रे इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरात कोरली गेली.
 या अशा महान महाराष्ट्र देशाचे वर्णन करायला गेले तर अक्षरशा शब्द अपुरे पडतात. 
  " लाभले इथे अनेक संत महात्मे,  लढले इथे हुतात्मे ।
     बघता बघता 'महा'राष्ट्रात या, धन्य झालेत जीवात्मे ।। "
आज  १ मे, सर्वश्रुत व सर्वाज्ञात असा महाराष्ट्रदिनाचा स्थापना दिवस. भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण. मला वाटलं कि आज थोडं का असोना मात्र या मराठी मातीच्या उपकारार्थ काही तरी नक्कीच लिहावं. म्हणूनच हा एक प्रयत्न.
आज जग बदलत चालले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आज प्रत्येकचजण यशाच्या शिखरावर चढू इच्छितो. जीवितांच्या आकांक्षा वाढत आहेत. मग यातच भरभराटीच्या या जगात आपण कुठेतरी, काहीतरी विसरतोच. कधी आपल्या लोकांना , कधी आपल्या संस्कृतीला, कधी आपल्या भाषेला किंवा कधी आपल्या प्रदेशाला.
आताची वर्तमान स्थितीही अशीच आहे. आज आपण सर्व आपल्या भाषेला कुठल्या जागी नेवून ठेवलय हे आपल्याला विचारात घेन्यासारखे आहे.
मात्र मला वाटते हे आज च्या दिवशी तरी नको बोलायला. म्हणून प्रयत्न करेन प्रत्येक गोष्ट सकारात्मक बोलण्याचा. आज आपण सर्वाना माहित आहे भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे प्रसंशनीय योगदान आहे. आज भारताच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा आहे. जर थोड अभ्यास करत गेलो तर आपल्याला कळेल आहे कि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात महाराष्ट्र राज्य भारतात अग्रस्थानी आहे. हि बाब खुप  अभिमानास्पद आहे.
या मातीवर जन्माघेणारी प्रत्येक व्यक्ती आपले सहकार्य यात देऊन जाते. बहुश्रूतांची, थोर पुढार्यांची, साहित्यकारांची, विद्वानांची, विचारवंतांची, थोर महिलांची, शिवरायांची, संतांची हि जन्मभूमी आहे.
मला या महान भूमीचा व मराठीचा खूप आभिमान आहे. प्रत्येकच   वेळी आता मला वाटते कि प्रत्येकाने जोरात जल्लोष करावा महाराष्ट्रामाझा चा. या मायभूमीत आज खूप प्रसंशनीय बदल झाले आहे. विकासच्या वाटा चौफेर पसरल्या आहेत , पावलोपावली विकासाची गती वाढत आहे. शिक्षणाच्या दालनांना आता प्रगतीच्या नव्या वाट भेटल्या आहेत. शासनही आज राज्यात प्रत्येकाच्या कल्याणार्थ योजना राबवत आहे, इथली माणसे माणुसकीची एक छाप सोडून जात आहेत. ज्यावेळी मराठी व महाराष्ट्र चा जयकार कानी गुंजतो, रंध्रारंध्रात एक मराठी रक्त सळसळ करत वाहतो. एल्क आल्हाद जणू शरीरात व्यापून  जातो……… 
या महाराष्ट्राची कितीही कौतुके  गायली तरी ती कमीच आहेत. किती अभिमानास्पद बाब आहे कि आजच्या दिवशी  महाराष्ट्र दिवसाचा जल्लोषात जयघोष केला जातो.  प्रत्येक राज्याला त्याचा स्वतंत्र इतिहास आहे. मात्र यात महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळा व विशिष्ट आहे. या भूमीवर आपण सर्व जन्मलो  एक आनंदाची बाब आहे, सौभाग्याची चीज आहे. प्रत्येक वेळी इथे अभिमानाची गीते गाईली जातात , मराठीचा  गोडवा जपला जातो, रक्तात मिसळलेल्या मराठीच्या बाण्याला जोपासलं जाते. इथे सर्वच चांगले आहे, व्यवस्थित आहे, सुरळीत आहे.
                                      "  पुष्पातील मकरंद शोधणारा मी एक भ्रमर ,
                                         या माय मराठी रानातला ।
                                        वेडावलोय आता मी होऊनी पामर,
                                         एक जीव मीही या मराठी मातीतला ।।"
आता दुसऱ्या पैलूंना जर विकासाच्या  पारड्यात तोलून बघतलं तर आपल्याला दिसेल कि एकीकडे विकास व दुसरीकडे आधुनिक मराठी माणसाचेजगणे यात खूप तफावत आहे. हि एक मिमांशा आहे कि आज काही लोक स्वतः ला शिक्षित समजून आपल्या महाराष्ट्राची वाट लावायला पण तयार झालेत. इंग्रजीच्या मळभखाली जगतांना त्याना मराठी म्हणजे हिणकस दर्जा ची वाटते. पण अस नाही आहे आपली संस्कृती आणि भाषा जपताना आपलेपणाचा भाव असावा. फायद्याची गोष्ट आली कि आपण तडकपणे व खूप जोमाने मराठी भाषेचा व महाराष्ट्राच्या नावाचा उपयोग करून घेतो, मग जेव्हा तिला जपण्याची गोष्ट  येते त्यावेळी आपण मात्र माघार का घेतो? का म्हणून पळ काढतो ?
इथे हे  चुकीचे ठरणार नाही कि आज खूप लोक, जे स्वतःला खूप प्रगत व श्रीमंत असल्याचा आव आणतात हेच लोक मराठी ला धुळीत घालण्यास कारणीभूत आहेत. अशांना मराठीत बोलणे म्हणजे एक शूद्रता वाटते . हि आजच्या काळातली खूप मोठी मिमांशा आहे. आजही आपण आपल्या मराठी व महाराष्ट्रासाठी विकासाची मागणी करतो कारण ते फक्त ते ह्यामुळेच.
 आज महाराष्ट्र दिनाच्या अनुसंगाने तरी याचं  विचार करणे गरजेचं  आहे? कारण हि  काळाची गरज आहे. आज प्रत्येक माणूस शिक्षित आहे मग तो या बद्दल नक्कीच विचार करू शकतो. शेवटी हीच विनंती कि चला आपण सर्व या मराठी मातीला जपूया यात नवे बंधुत्वाचे नाते व आपुलकीची नाती जपूया…
 तुम्हा सर्वांकडून  हीच एक अपेक्षा.
हि तर  आता सुरुवात आहे. लवकरच भेटूया पुन्हा माय मराठीच्या सुपुत्रांनो…
 जय महाराष्ट्र, जय मराठी
जय शिवराय …… पुन्हा एकदा महाराष्ट्रदिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……